Sunday, June 5, 2011

(३३) तुमचं काय गेलं?......................................कलियुग



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे

- केशवसुत




नव्या मनूतिल नव्या "दामा"चा चोर पुढारी आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे




तुमचं काय गेलं? कलियुग

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की!
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच!
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

कवी : मंगेश पाडगांवकर



ह्याने लाच दिली त्याने लाच घेतली
असू दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

ते दोघे एका बागेमध्ये भेटले
जरा एकमेकांना खेटून बसले
हा पिशवीत नोटा ठिच्च भरून आला
भेटला तर भेटू दे की, खेटला तर खेटू दे की!
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं?

ह्याने लाच दिली त्याने लाच घेतली
असू दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

हा एकदा त्याच्या पाठी लागला
कंत्राटासाठी बड्या कुठल्या तरी
रात्री त्याच्या घरी गेला
घरात तो होता जेव्हा
आणि वाजवली बेल्‌ दारावरची;
आत ह्याला घेऊन
त्याने दार लावलं
लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की
ह्याच्या त्याच्या पूर्वजांनी असणार तेच केलं

ह्याने लाच दिली त्याने लाच घेतली
असू दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

घरात येजा असते खूप हल्ली
नेहमी चालणारच असली प्रकरणं
तो थोडाच बसणार आहे
घोकत गांधीजींचे विचार
“खुर्ची”चे परिणाम हे होणारच!
कोणाला ना कोणाला जवळ ती ओढून घेणारच
घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं?

ह्याने लाच दिली त्याने लाच घेतली
असू दे की!
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?





No comments:

Post a Comment