Saturday, June 4, 2011

(२८) रेशमाच्या रेघांनी........................रेशमाच्या अक्षरांनी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



रेशमाच्या रेघांनी रेशमाच्या अक्षरांनी



रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला !

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !

जात होते वाटंनं मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !

भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !

कवयित्री : शान्‍ता शेळके

रेशमाच्या अक्षरांनी, निळ्यानिळ्या शाईने
फर्मास कविता मी लिहिल्या
हात नका लावू माझ्या बाडाला!

कागद घेऊन सफेत नवे कोरे
भरले मी त्यांते अतिहर्षभरे
गुंफियली यमके, प्रास त्यांच्या जोडीला
हात नका लावू माझ्या बाडाला!

ज्येष्ठ कविश्रेष्ठ मी रहातो तोर्‍यात
अवचित आलात ना माझ्या भोवऱ्यात
तुम्ही माझ्या खमिसाचा शेव का हो ओढीला?
हात नका लावू माझ्या बाडाला!

भीड काही ठेवा एका कविश्रेष्ठाची
मुरवत राखा एका एकसष्टी ज्येष्ठाची
काय म्हणू राव मी तुमच्या अनादराला?
हात नका लावू माझ्या बाडाला!

No comments:

Post a Comment