Sunday, June 19, 2011

(११६) शतकानंतर आज पाहिली..........आणि आणखी साठ वर्षांनंतर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



शतकानंतर आज पाहिली आणि आणखी साठ वर्षांनंतर



शतकानंतर आज पाहिली
पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले..
भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे
तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये..
आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी..
झाले आज विराट

पुरेत अश्रू , दुबळे क्रंदन
भावपूर्ण करू विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही..
प्रतिभाशाली भाट

कवी : वसंत बापट


उगवतेय गतषड्दशवर्षे
धुरकटशीच पहाट
धूमची धूम जिकडेतिकडे
क्षितिज न दिसतेय आहे कुठे ते
कल्लोळ जणु धुळीचे उठलेत..
न दिसे कोणा वाट

लफंगेगिरी चालू दिनरात
राजकारणाच्या कुरणात
बरबटूनी हात तयांचे
लागली या देशाची वाट

चोरांनी जणु यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
बळी देऊनी अजमेषांचे..
रक्ताचे वाहती पाट

किंवा पेटवुनी मशाली
गुंड करती राखरांगोळी
उभ्या घरांची, घरदारांची..
कुकर्म सारे अचाट

ढाळती अश्रू , करती क्रंदन
भावपूर्ण अन विनम्र वंदन
ह्या ढोंग्यांचे होऊ आम्ही..
उत्सुकतेने भाट!


No comments:

Post a Comment