Tuesday, June 14, 2011

(६८) कुणाच्या खांद्यावर....................................डोके



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



कुणाच्या खांद्यावर डोके



कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे


कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे


दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे


अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे, पोकळ समाधी
देई कोण हाळी त्याचा, पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे, ज्याच्या गळी साजे


कवी : आरती प्रभू



कुणाच्या खांद्यावर तल्लख डोके
कुणाच्या खांद्यावर रिकामे खोके

कशासाठी उभारावे तंबू ठोकून
तंबाखू खाऊन अन्‌ मग “रक्त” पिचकारून
त्यापेक्षा रहावे की घरी झोपून
कुणाच्या खांद्यावर तल्लख डोके
कुणाच्या खांद्यावर रिकामे खोके

जाती सारे जाती येथे आपल्या विसरून
नाना जाती अंधारात जाती झोपून
जातींची नावे जाती दमून, घोकून
कुणाच्या खांद्यावर तल्लख डोके
कुणाच्या खांद्यावर रिकामे खोके

अर्थ झाला दुर्मिळ, वाचणे एक व्याधी
कवींची गाणी; निव्वळ पोकळ समाधी
देई कोण टाळी त्याची बांधा समाधी आधी!
कुणाच्या खांद्यावर तल्लख डोके
कुणाच्या खांद्यावर रिकामे खोके



No comments:

Post a Comment