खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तनमन अमृत बनते ग | कोकशास्त्रातले कोकाकोलाचे स्तवन |
---|---|
अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग; अमृतमय श्वासात आपुल्या अमृतनभ थरथरते ग! अमृतमय मौनातच रिमझिम रिमझिमती अमृतधारा; भिजते माझे अंगअंग, पण अंग तुझेही भिजते ग! रुधिरातील कल्लोळ हावरा रुधिराताच फिरला विरला; एकच इवले कातर स्पंदन अंतरात किलबिलते ग! आत्म्याच्या चांदण्यात अपुल्या हुरहुरत्या हाका घुमती; जन्माच्या वेलीचे सावध पानपान सळसळते ग! कायांचा कापूर बंद पण दरवळ बघ तरळत उठला; स्पर्शाविण स्पर्शांचे वादळ धमन्यातुन भिरभिरते ग! प्राणाच्याही पार आपुल्या कुठेतरी भेटी घडती; गडे, मला हे जाणवते अन् तुजलादेखिल कळते ग! स्वप्नाफुलानी आज शिगोशिग डोळ्यांची परडी भरली; तुझी नव्हाळी, माझी तगमग... कोण कुणाला खुडते ग? कवी : सुरेश भट | कोकमय मी, कोकमय तू, तनमन कोकची बनते ग; कोकमय श्वासात आपुल्या कोकांबर थरथरते ग! कोकमय मौनातच रिमझिम रिमझिमती कोकच्या धारा; भिजते माझे अंगअंग, पण अंग तुझेही भिजते ग! कोकमधिल कल्लोळ हावरा कोकचा कॅन उघडता विरला; एकच इवला बुद्बुद उरला अंतरात गलबलते ग! आत्म्याच्या वळचणीत अपुल्या कोकच्या हाका घुमती; कोकमचे सरबत सावध रागाने सळसळते ग! दारुण वारुणी बंद पण दरवळ बघ तरळत उठला; स्पर्शाविण वारुणीचे वादळ धमन्यातुन भिरभिरते ग! प्राणाच्याही पार आपुल्या कोकशी भेटी घडती; गडे, मला हे जाणवते अन् तुजलादेखिल कळते ग! स्वप्नाफुलानी आज शिगोशिग कोकची पिंपे भरली; आण कोकच्या दोन बाटल्या कोक पिण्या कुणी चुकते ग? |
वाचकांना टीपा :
वैश्वदत्त नावाच्या सातव्या इसवी शतकातल्या राजाच्या दरबारात कोक नावाच्या एका पंडिताचा समावेश होता. (पारभिद्र पंडित कोकचा पिता आणि तेजोक पंडित कोकचा पितामह होता.) कोक पंडिताने इतर पांडित्यपूर्ण ग्रंथांसमवेत "कोकशास्त्र" ह्या नावाने प्रसिद्ध असलेला कामशास्त्रावरचा एक ग्रंथ रचला होता. कोकाकोलाचे वरचे स्तवन कोक पंडिताने त्याच्या "कोकशास्त्र" ग्रंथाच्या शेवटी समारोपात अंतर्भूत केले होते; ते मी वर प्रसिद्ध केले आहे. (कोकाकोला पेयातले कोकाकोला कंपनीच्या चालकांनी कसोशीने अगदी गुप्त राखलेले घटकही वास्तविक कोक पंडिताने १४०० वर्षांपूर्वीच "कोकशास्त्रात" एके ठिकाणी सांकेतिक भाषेत लिहून ठेवले होते असा एक जनप्रवाद आहे.)
"बुडबुडा" ह्या मराठी शब्दाची व्युत्पत्ती "बुद्बुद" ह्या संस्कृत शब्दात आहे. संस्कृत मराठी भाषेची "आजी" आहे. वरच्या गंमतिकेत वापरलेल्या जागी तालाच्या दृष्टीने "बुडबुडा" हा १००% “खडखडीत" मराठी शब्द खपून गेला असता. पण "बुद्बुद" ह्या शब्दात "ड"ऐवजी "द" हे सौम्य ध्वनीचे व्यंजन अंतर्भूत असल्यामुळे त्या शब्दात ध्वनिसौंदर्य जरा जास्त आहे; म्हणून कोक पंडिताने संस्कृत "आजी"ला त्या जागी त्या वेळी पाचारण करायचे ठरवलेले दिसते.
(“कल्पक” कवींना त्यांच्या कविता जन्माला घालताना कवितांमधल्या तालाचा/प्रासाचा "ताळमेळ" जमवताना "कष्ट" भासले असताही संस्कृत "आजी" चा उपयोग अधूनमधून "चातुर्याने" "सोयिस्करपणे" करता येत असतो!)
No comments:
Post a Comment