Wednesday, June 15, 2011

(७३) बाभुळझाड..................................गवताचे गाणे



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



बाभुळझाड गवताचे गाणे




अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांदयावरती सुतारांचे
घरटे घेउन उभेच आहे

कवी : वसंत बापट


त्याच बाभळीच्या पायथ्याशी
गवत आहे थोडे विनामिजासी
न ताठर कणा, न टणक पाठ
न अस्सल लाकूड, न भक्कम गाठ
वारा खात गारा खात, मजेत ते उगवून आहे

न देहा त्याच्या बारा फाटे
अंगावर ना छोटुकलेही काटे
आभाळात खुपसायला कुठली आलीत बोटे?
वारा खात गारा खात, मजेत गवत उगवून आहे

अंगावर त्याच्या लवलव आहे
माथ्यावर छोटुकला तुरा आहे
निरखून पहा, तुर्‍यात खूप सौंदर्य आहे
वारा खात गारा खात, मजेत गवत उगवून आहे

जगले आहे, जगणार आहे -
काही काळ; मग वाळणार आहे
गवत नवे तुर्‍यांमधून येणार आहे
वारा खात गारा खात, मजेत गवत उगवून आहे


No comments:

Post a Comment