Saturday, June 4, 2011

(२१) काही बोलायाचे आहे.....................गप्प रहायाचे आहे



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



काही बोलायाचे आहे गप्प रहायाचे आहे




काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही

कवी : कुसुमाग्रज



गप्प रहायाचे आहे पण गप्प रहाणार नाही
मशीदीच्या नमाजखान्यात नमाज मी पढणार नाही

माझ्या तिजोरीत पैका दाटीवाटीने राहे
पण त्याची पाकळीही कोणाला मी देणार नाही

घरातल्या एका पेटीत मला गवसले अलगूज
परि ओठांचा संग त्याला मुळी मिळणार नाही

एक खांब असे उभा एका रस्त्याच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधीही कळणार नाही

खांबाजवळ उभे दोघे करत काहीतरी खलबत
त्याचा सुगावा कोणाला कधीही लागणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने , मंत्र्या, झालो सुबत्तेचा धनी
बोलविता तू धनी, कधी तुला वंचिणार नाही!


No comments:

Post a Comment