Monday, June 20, 2011

(१२१) नवलाख तळपती दीप विजेचे येथ............मंत्रीपदधारी सौदागर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



नवलाख तळपती दीप विजेचे येथ मंत्रीपदधारी सौदागर



नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुल केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!

कवी : कुसुमाग्रज


नवलाख तळपू देत दीप विजेचे तेथ
उतरू देत तारकादळे जणू नगरात
आपण करू या सौदा अपुला ह्या बैठकीत
कोणा होईल न माहित अपुली अंदरकी बात!

वाऱ्यावर येथिल पंख्याच्या अतिसंथ
करत कुजबुज पाळू या अपुला पंथ
आपण करू या सौदा अपुला ह्या बैठकीत
कशास दौडा वेळ व्यर्थ करत बसत रवंथ?

हेलावे करती सागर तेथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
आपण करू या सौदा अपुला ह्या बैठकीत
सौद्याच्या तपशीलाचा घालूयाच घाट!

बेहोष चढे जलशांना तेथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
आपण करू या सौदा अपुला ह्या बैठकीत
राहील दोघांमधला अपुल्या वायदा अभंग!

लावण्यवतींचा लालस तेथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
आपण करू या सौदा अपुला ह्या बैठकीत
मारत डोळे निःशंक घेऊ या आपण अपुला श्वास!


No comments:

Post a Comment