Sunday, June 19, 2011

(१०५) राधा ही बावरी................................पोलीस!



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



राधा ही बावरी पोलीस!



रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी!

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी!

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसमोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगाआडुनी प्रेम तयांचे पाही

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी!

कवी : अशोक पत्की


रंगात रंग तो खाकी रंग पाहून नजर भिरभिरते
ऐकून शिटी बिथरून भान ही चाल पोलिसी बघते
त्या उच्चसुरांच्या बोलीमधली साद ऐकुनी होई -
स्वारी ही बावरी, चोराची स्वारी ही बावरी!

वेड्यावाकड्या वृक्षांची करडी पाने हलताना
चिंब चिंब देहावरुनी घर्मधारा निथळताना
हा दरवळणारा दुर्गंध कशाचा मनास उबगून जाई
हा सुसाट वारा पुढ्यात काय ते कानी सांगून जाई

त्या उच्चसुरांच्या बोलीमधली साद ऐकुनी होई -
स्वारी ही बावरी, चोराची स्वारी ही बावरी!

आज इथे या तरुतळी सूर शिटीचे खुणावती
सामोरी जाताना त्यास जड पाऊले अडखळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे स्वारी टरकून जाई
हा चंद्र चांदणे ढगाआडुनी मजा तयाची पाही

त्या उच्चसुरांच्या बोलीमधली साद ऐकुनी होई -
स्वारी ही बावरी, चोराची स्वारी ही बावरी!


No comments:

Post a Comment