Sunday, June 19, 2011

(१००) श्रावणझड................................आणि पावसाची झोड



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



श्रावणझड आणि पावसाची झोड



श्रावणझड बाहेर मी अंतरी भिजलेला
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला

अभ्रांचा हृदयभार थेंब थेंब पाझरतो
विझलेला लांब दिवस चिंब होत ओसरतो

उधळ उधळ पल्वलात संगळून जळ बसते
क्षणजीवी वर्तुळात हललेले भासविते

चळते प्रतिबिंब जरा स्थिर राहून थिजताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना

रिमझिम ही वार्‍यासह स्थायी लय धरून असे
संमोहन निद्रेतुन शब्दांना जाग नसे

कवी : अनिल


पाऊसझोड बाहेर, मी सोफ्यावरी बसलेला
पाहत टिव्ही असता कधीमधी निजलेला

"करुण नाट्य" मालिकेतुन थेंब थेंब पाझरते
अनाद्यनंत लांबवण सहनशक्ति परीक्षते

उथळ उथळ नाट्यसूत्र ढळून सूत्र बैसते
चौकोनी वर्तुळातचि फसलेले भासते

नेत्र मिटती कधी उघडती टिव्ही चालू असताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना

रटाळ जरी मालिका, स्थायी लय धरून असे
संमोहन, कधी जाग असे मज कधी जाग नसे


No comments:

Post a Comment