कवितांचा क्रम अर्थात "टाइमस्टॅंप्स्"नुसार "मागून पुढे" आहे.
खालच्या अनुक्रमणिकेत कवी/कवयित्रींच्या नावावर किंवा कवितेच्या शीर्षकावर "क्लिक्" केले असता त्या कवितेचा "ब्लॉग्" लगेच पहाता येईल.
============================================================
केशवसुत कवींची "आम्ही कोण" ह्या शीर्षकाची एक प्रसिद्ध कविता १९०२ साली "मनोरंजन" मासिकात छापून आली होती. सगळ्या कविवर्गाचे साभिमान स्तवन केशवसुतांनी त्या कवितेत केले होते.
त्यानंतर वीस वर्षांनी प्र. के. अत्रेंनी "केशवकुमार" ह्या टोपणनावाखाली त्याच शीर्षकाची एक कविता प्रसिद्ध केली होती.
काही वर्षांपूर्वी मंगेश पाडगांवकरांनी "आपलं गाणं" ह्या शीर्षकाची एक कविता प्रसिद्ध केली होती.
त्या तीन कविता आणि शिवाय पाडगांवकरांची "धरिला वृथा छंद" ह्या शीर्षकाची आणखी एक कविता अशा चार कविता मी खाली उद्धृत केल्या आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आम्ही कोण | आम्ही कोण |
---|---|
आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके- देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया; विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया, दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके; पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया - सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या; फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके! शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे? पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते! आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे; आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे! कवी : केशवसुत | ’आम्ही कोण?’ म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ’फोटो’ मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? किंवा ’गुच्छ’ ’तरंग’ ’अंजली’ कसा अद्यापि ना वाचिला? चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ते आम्ही- परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ते आम्ही- न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा ’उदे’! दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! आम्हाला वगळा- गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! आम्हाला वगळा- खलास सगळी होतील ना मासिके! कवी : प्र. के. अत्रे (केशवकुमार) |
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपलं गाणं गाय जवळ घेते नी वासरू लुचू लागतं आपण गाऊ लागतो नी गाणं सुचू लागतं गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही म्हटलं पाहिजे असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं असंच नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं गात गात केंव्हाही जाता येतं आपलं गाणं केंव्हाही गाता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं चुलीपुढे रांधताना गाणं म्हणता येतं मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये न्हाताना भरली बादली डुलू लागते आपण गाणं गाताना. फांदीतून पान फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता कधी गाणं मिठीचं कधी आतूर दिठीचं कधी गाणं एकाचं कधी एकमेकाचं गाणं हेच गाण्याचं मोल असतं गाण्यापुढे बाकी सारं फोल असतं फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही द्वेष करून गाण्याला शापता येत नाही झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे पण एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते आपलं गाणं आपल्यालाच पटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे. कवी : मंगेश पाडगांवकर धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद? जरि जीव हो श्रांत नाही तृषा शांत जलशून्य आभास शोधित मृग अंध झाले तुझे भास मी रोधिले श्वास माझीच मज आस घाली असा बंध पथ सर्व वैराण पायी नुरे त्राण माझेच घर आज झाले मला बंद कवी : मंगेश पाडगांवकर | भेळेचा प्रभाव मूल रेतीत बसतं नी किल्ला एक रचू लागतं आपण भेळ खाऊ लागतो नी गाणं चटकन सुचू लागतं गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो गाणं तसं अरण्यातही आपण गाऊ शकतो जनात गायलात म्हणून तुम्ही गायक नसता अरण्यात गायलात म्हणजे तुम्हा तिथे श्रोते नसतात एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला सुचलं पाहिजे आणि त्याकरता भेळ चवदार आपण नक्की खाल्लीच पाहिजे असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं असंच नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं गात गात केंव्हाही जाता येतं -- अर्थात रस्ता निर्जन असेल तेव्हा. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं भांडी घासत असताना गाणं म्हणता येतं केर काढताना गाणं म्हणता येतं हवेत किल्ले बांधताना गाणं म्हणता येतं जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये न्हाताना भरली बादली रडू लागते आपलं गाणं ऐकताना. बेंबीतून गवत फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे उपटल्या गवताचं जे करतो ते मग त्याचं केलं पाहिजे तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं त्याच क्षणी दोघांनाही कळतं गाणं माझं भिकार किती ते. मग तुम्ही तुमचंच गाणं गाऊ लागता कधी गाणं मिठाचं कधी चण्याच्या पीठाचं कधी गाणं चाकाचं कधी गाणं चाकूचं गाणं हेच गाण्याचं मोल असतं जसं ओल्या हरभर्यावरचं फोलपट असतं फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही सुरी घेऊन गाण्याला कापता येत नाही आळंब्यागत मातीतून गाणं फुटलं पाहिजे आणि सगळीकडे आळंबीच आळंबी असं झालं पाहिजे पण एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला सुचलं पाहिजे आणि त्याकरता भेळ चवदार आपण नक्की खाल्लीच पाहिजे धरिला काव्यरचना छंद धरिला काव्यरचना छंद परि मार्गी होती मोठी धोंड ! न जुळुन कवन जीव होई बहु श्रांत, छगन जलशून्य आभास शोधित मृग अंध झाले मधुन भास मी रोधिले श्वास हन्त, दीर्घश्वासरोधन न शक्य, येई बंध ! पथ सर्व वैराण पायी नुरे त्राण हन्त, हृदय माझे झाले आज बंद ! *********************************** काय आश्चर्य! चमत्कार होई! हृदय लागे पुन्हा टुकटुकू नि विचार आला करू या हायकू शब्द मोजके झटपट कविता लोक देतिल सन्मान, मान्यता शब्दांशी चालू केली झटपट अन् केली पुष्कळ खटपट हन्त, उमगे हायकू रूप अति खट मिरचीसारखे तिखट हास्य ते करी विकट वदे "मर्कट, सोड हे तर्कट “कशा लावुन घेशी कटकट “श्राद्ध कशा घेशी विकत “रच कविता अनुसरुन वाग्भट “पाडगांवकर - भट - बापट" मग जाणून परिस्थिती बिकट म्हटले करू या आपण लटपट करून पाहू शक्य ती लगट काव्यरचनेशी , जेवि बापट - भट जरी न होईल काव्य झटपट जोडत बसणे "ट"ला "ट" हे काम नसावे फार दुर्घट ऐशी करुनी स्वगत वटवट बसलो काव्य लिहिण्या झटपट घेउनी हाती कागद- झरणी हुकमी विषय तरुण - तरुणी प्रणयचेष्टा तयांच्या वारुणी तरुण - तरुणी जणु हरण - हरिणी विहरणे सोप्पे तयांच्या भावतरंगिणीं शृंगार - आनंद - करुणभावांची वर्णी लावून भरुया बरणीवर बरणी भार वाहुनी जरी वाकेल धरणी अधिक पृथु प्रपंच प्रभवे मन्मनी उघडू आपण प्रचंड गिरणी लावुनि तिस काव्योत्पादनकारणी पाहुन अपुली अचाट करणी रसिकजन पडतिल अपुल्या चरणी भरवतिल शोकसभा अपुल्या मरणी ज्यांमधे अपुली गाईल गाणी जनता होउन पार दिवाणी म्हणेल कवी हा होता हिरकणी आजुबाजुस ज्याच्या हीन फुटके मणी देवाची करणी, नारळात पाणी ! *********************************** तरुण - तरुणींच्या भावतरंगिणीं शब्दबुडबुडे हुकमी कुडबुडे जंत्री तयांची त्रोटक देतो - छंद, मंद, गंध, सुगंध, सबंध, संबंध, निशिगंध, कंद, कुंद, गेंद, गुंड, आनंद, नंद, फंद, वंद, अंध, बंध, धुंद, मकरंद, बंद, चांद, चंद्र, इंद्र, गोंद, नोंद, हिंद, अरविंद, वांड, बंड, बेंड, धिंड; आणि हवेतच भरीला प्राण, मन, बीन, जीवन, नवीन, मंथन, वंदन, चिंतन, चिरंतन, श्वास, निःश्वास, अश्रू, हास, हृदय, प्रेम, प्रीती, भीती, वात, वसंत, स्मित, सस्मित, रीत, रात, पहाट, प्रभात, कमल, कोमल, काल, ताल, नाद, सूर, हरित, दुरित, गीत, संगीत, हार, जीत, अंग, देह, बाहू, स्पर्श, लाज, लज्जा, कज्जा, मज्जा, भुरभुर, थरथर, झिरझिर, झिरमिर, निळाई, नभ, गगन, अंबर, श्रावण, पाऊस, धारा, गारा, संध्या, संभ्रम, विभ्रम, वारा, समिंदर, सागर, ... अथांग तत्सम थांबवितो ही जंत्री अता मम |
No comments:
Post a Comment