Sunday, June 19, 2011

(११०) मरण........................................डॉक्टरच्या ऑफिसात



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



मरण डॉक्टरच्या ऑफिसात



अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा
विनम्र लपवू कुठे ह्र्दयस्पंदनाचा झरा

उन्हात मन शिंपिले पळसपेटला पारवा
कुडीत जळतो जसा मरणचंदणाचा दिवा

कुशीत जड अस्थिला नितळ पालवीची स्पृहा
भयाण मज वाटतो रुधिर अस्त गांधार हा

उदास भयस्वप्न की समिर येथला कोवळा
गळ्यात मग माझिया सहज घातला तू गळा

सुगंध दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी
तुडुंब भरले तुवा कलश अमृताचे घरी

जळात जरी नागवी सलग इंद्रियांची दिठी
विभक्त जणु कुंतिला शरण कर्ण ये शेवटी

कवी : ग्रेस


सकाळी फुलला घसा, हो आवाज मम घोगरा
न कळे संपवू कसा खोकल्याचा ससेमिरा

उन्हात जणु तापले शिर, जणु पेटली ग्रीवा
कुडीत जळतो जसा अखंड लामणदिवा

कुशीत एका अस्थिला न वाटते स्वस्थता
असेलही वाटते मज रुधिरदाब-व्यथा

परि न भयस्वप्न की असेल संपला बहुशः
प्रवास इथला; असती अजुनि वर्षे दहा

"बाटल्या" दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी
तुडुंब भरले तुवा कलश औषधांचे घरी

गळ्यात तुझिया असे माळ स्टेथॉस्कोपची
मी भक्त तुझा , डॉक्टरा, ग्वाही देतो अजी


No comments:

Post a Comment