Sunday, June 12, 2011

(५५) तेजोनिधी लोह गोल........................मंत्रीपदधार्‍याचे स्तवन



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तेजोनिधी लोह गोल मंत्रीपदधार्‍याचे स्तवन

तेजोनिधी लोह गोल, भास्कर हे गगनराज
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज

दिव्य तुझ्या तेजाने, झगमगले भूवन आज,
हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज.

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण होऊन अणुरेणू उजळिती

तेजातच जनन मरण, तेजातच नवीन साज
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज

ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्य सभा
दाहक परी संजीवक, करुणारून किरणप्रभा

होवो जीवन विकास, वासुधेची राख लाज
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज

तेजोनिधी लोह गोल, भास्कर हे गगनराज
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज!

कवी : पुरुषोत्तम दारव्हेकर


द्रव्यनिधी गोलमाल, तस्कर हे अराजकराज
हे बहुगुणि गोमराज, तस्कर हे अराजकराज

दिव्य तुझ्या चलाखीने, झगमगे भुवन रोज
हे बहुगुणि गोमराज, तस्कर हे अराजकराज

कोटी कोटी वित्त तुझे कुबेरास लाजवते
सुवर्णकण होऊन ते दशदिशा उजळते

वित्तजनन आमरण, वित्तातच तुझा माज
हे बहुगुणि गोमराज, तस्कर हे अराजकराज

तुंदिल मूर्ती तुझी, हस्तकमंडळ दिव्य सभा
दाहक परी क्रोध तुझा, करुणाहीन जणु यम उभा

जनताजीवन भकास, न त्याची तुज लाज
हे बहुगुणि गोमराज, तस्कर हे अराजकराज

द्रव्यनिधी गोलमाल, तस्कर हे अराजकराज
हे बहुगुणि गोमराज, तस्कर हे अराजकराज




No comments:

Post a Comment