Wednesday, June 1, 2011

(८) स्वर आले दुरुनी............................................... हेरांची गुप्त सभा






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






स्वर आले दुरुनी हेरांची गुप्त सभा



स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वाऱ्यांचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतुन क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केलि कुणी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

कवी : यशवंत देव



हेर जमले दूरदुरुनी
जुळली सगळी त्यांची बतावणी

गुप्तार्थ उसासे वाऱ्यांचे
लुकलुकणे चोरटे ताऱ्यांचे
कुजबुज हलके वेलींची
हलणे नाजुक पर्णांचे
जमली हेरमंडळी ही उद्यानी
जुळली सगळी त्यांची बतावणी

खलबत त्यांचे सुरु झाले
एकमत न परंतू घडे
होता दो योजनेची शकले
हुकुम कुणीतरी पुकारले
नि देई इशारे तो म्होरक्या कुणी
जुळली सगळी त्यांची बतावणी
* * * * * * * * * * * * * * * * * *
पडसाद कसा आला न कळे
अवसेत जणू शशधर उगवे
योजन सगळे धोक्यात पडे
निमिषात मंडळ परि सावरले
किमया असली का पाहिली कुणी?
जुळली सगळी त्यांची बतावणी



No comments:

Post a Comment