Tuesday, June 21, 2011

(१३५) स्वातंत्र्यदेवीची विनवणी..................मंत्रीपदधार्‍याचा शाहिरी 'फटका'



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



स्वातंत्र्यदेवीची विनवणी मंत्रीपदधार्‍याचा शाहिरी 'फटका'



पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

कवी : कुसुमाग्रज



पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज अजि न का?
मीच सुनवतो तर्जनी दावुनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय जनांनो मला असे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

होशियारिच्या गळ्यात माळा अभिमानाने घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हे तर माझे ब्रीद असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे ऐसे मी हो म्हणू न का?

'जनसेवेस्तव माझी कचेरी' ऐसा असे माझा डंका ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचेहि मी घेऊ न का?

प्रचंड पुतळे पथापथावर न बांधलेत माझे अजून का ?
उत्साहे मम पंथ अनुसरा, मम गोडवे गाण्या चुकू नका॥

सत्ता मुबलक हाती असे पण अधिक सत्ता मजसि गमे
करीन मंदिरी सुवर्णलंका अशी प्रतिज्ञा मी घेऊ न का?

पिंगा घाला माझ्या भवती, दीप पेटत का मजपुढे नसे?
'इथे भ्रष्टता, इथे शिष्टता', शंख उगाचच फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य मी सदा वदे ।
सच्छीलतेचा मी सूर्य उगवता, उगाच मजवर भुंकू नका॥



No comments:

Post a Comment