Tuesday, June 28, 2011

(१६१) दहा दिशांनी दहा मुखांनी...................रंकाचा राव कैसा जाहला



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



दहा दिशांनी दहा मुखांनी आहे किस्सा हा,
रंकाचा राव कैसा जाहला



दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो
आसवांत या भिजली गाथा, श्रोते, ऐका हो!
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

गंगेवाणी निर्मळ होतं असं एक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला , कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला नदीपार केली
नार सूड भावनेनं उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

जाब विचाराया गेला तिनं केला डाव
भोवर्‍यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिनं तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

खुळ्या जीवा कळला नाही खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आळली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळूनिया गेली आता, जगायची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गाईली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

कवी : जगदीश खेबुडकर
चित्रपट : पिंजरा (१९७७)

दहा दिशांनी दहा मुखांनी आज भाषण करतो
नीट ऐका, श्रोत्यांनो, जे आहे मी सांगतो
आहे किस्सा हा, रंकाचा राव कैसा जाहला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

गंगेवाणी निर्मळ होतं असं एक गाव
दिवस कसेतरी कंठत ज्यात होतो मी, राव.
माझा नव्हता ठावठिकाणा काही जगताला
पण मग नशीबाने खेळ छान मांडला!

माझ्या गावी आला एकदा एक कुणी संत
पुण्यवान म्हणती त्याला , कुणी म्हणे महंत
प्रवचनानंतर त्याच्या तो एकदा मला भेटला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

मला म्हणाला, “होशील तू राजकारणी
"लावशील तुझे आयुष्य बहुत तू सत्कारणी
"आशीर्वाद आहे माझा रावजी तुजला"
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

लवून मस्तक नमस्कार मी त्या संताला केला
अन्‌ राजकारणात शिरण्याचा विचार माझा झाला
लाज भीड नीती ह्यांना मी रामराम ठोकला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

जाब विचाराया मला काही होती टाप कुणाची
गोळा केली माझ्याभावती सैना पित्त्यांची
टाच मारुनी राजकारणी दौरा माझा चालला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

खुळ्या जनतेला नाही कळला माझा धूर्त खेळ
लंबी लंबी आश्वासने देणे आहे पोरखेळ
निवडणुकीत एका माझा विजय सहज झाला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

जन्मभर चालणार आता राजकारणाचा तमाशा
लवकरच होईन मुख्यमंत्री अशी मम महत्त्वाकांक्षा
आज आहे मीच माझा पोवाडा गायला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

याच देहाचे आहे करते जनतासंमर्द पूजन
त्या पूजनाने सदा मिळते मला बहुत स्फुरण
माझ्या सोहळ्याचा आहे अविरत रथ चालला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!


No comments:

Post a Comment