Monday, July 4, 2011

(१७१) तक्ता..................................तक्त्यावर नसे कुठल्याही शब्दांचा मक्ता!



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तक्ता तक्त्यावर नसे
कुठल्याही शब्दांचा मक्ता!



अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन
संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या
जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी
ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची
शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही

शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात
बाण मारणार नाही
आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर
कप फोडायची काय?

कवी : अरुण कोलटकर


अजगर, आजोबा, इमारत, ईश्वर
उशी, ऊन, एरंडेल!
सगळे नवी विटी-नवा दांडू
खेळत बसलेत

ऐश्वर्य, ओठ, औत, अंडे
करवत, खड्डा, गवत, घड्याळ
सगळे आता नवे मालक
पूर्वीच्या जागांचे आहेत

चष्मा, छ्प्पर, जनावर, झरणी
टक्कर, ठग, डमरू, ढाल आणि खाण
सगळे आपल्या नव्या जागा
पटकावून बसलेत

तलाव, थवा, दगड, धरण, नमस्कार
पत्र, फटाके, बगळा, भगदाड, मगर
यांचे "बृहन्महाराष्ट्र मराठी भाषा संमेलन"
भरले आहे

यदुवीर, रवंथ, लढाई, वरण, शहाळे
षड्रिपू, सतरंजी, हमाल, खळ आणि क्ष-किरण
या सगळ्यांनी सिंहासन मिळवलंय

आजोबा खळीला उशीत घालणार नाहीत
भगदाड बगळ्याला लढाईत जिंकणार नाही
टक्कर होऊन जनावर जखमी होणार नाही

शहाळे जोपर्यंत झरणी खात नाही
तोपर्यंत क्ष-किरण गवताच्या गंजीत
खाण गवसणार नाहीत
आणि एरंडेलाने ओठांना स्पर्श केला नाही
तर ओठांना थव्यात जाऊन
करवतीने गवत कापायची गरज काय?


No comments:

Post a Comment