खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
ते दिवस आता कुठे | ते दिवस आता परतले |
---|---|
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरीही सावली भेटायची त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची पावसाला पेच होता ह्या सरी वळवू कुठे चिंबताना त्या पुलाखाली ती नदी थांबायची वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे हीच शाळा व्हायची जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची कवी : अरुण म्हात्रे | ते दिवस आता परतले जेव्हा कविता सुचायची श्रोतृगणी जी उदासता पसरवणारी नसायची. त्या तिच्या वाटेवरी रम्य वृक्षझाडी दिसायची ती निरखताना वृत्ती दिवाणी माझी व्हायची ! पेच असे माझ्या मनाला उत्साह माझा थोपवू कुठे आनंददायी काव्यगंगा ओसंडून माझी वहायची! वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे हीच सृष्टी असायची. येई ध्यानी उदास कविता प्रकाशणे अप्रस्तुत असे केला निश्चय उदास कविता यापुढे न प्रकाशायची. आठवे रम्य कविता बालकवींची “फुलराणी”; सोडता मी गाव हिरवळ मागे रहायची. तपासले माझे खिसे अन् सापडली एकात चांदणी त्या चांदणीवर आता कविता मी रचायची! |
फुलराणी
हिरवे हिरवेगार गालिचे--हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरतीं--फुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणांत--अव्याज मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला--अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी--झोंके घ्यावे, गावीं गाणीं;
याहुनि ठावें काय तियेला--साध्या भोळ्या फुलराणीला?
पुरा विनोदी संध्यावात--डोलडोलवी हिरवें शेत;
तोच एकदा हांसत आला--चुंबून म्हणे फुलराणीला--
"छान माझी सोनुकली ती--कुणागडे ग पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून--हळूच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा--आवडला अमुच्या राणींना?"
लाजलाजली या वचनांनी--साधी भोळी ती फुलराणी!
आंदोलीं संध्येच्या बसुनी--झोंके झोंके घेते रजनी;
ह्या रजनीचें नेत्र विलोल--नभीं चमकती ते ग्रहगोल!
जादूटोणा त्यांनी केला--चैन पडेना फुलराणीला;
निजलीं शेतें, निजलें रान--निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणी ही--आज अशी ताळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशीं डोळा--काय जाहलें फुलराणीला?
या कुंजातून त्या कुंजातून--इवल्याश्या ह्या दिवट्या लावून,
मध्यरात्रिच्या निवांत समयी--खेळ खेळते वनदेवी ही
त्या देवीला ओव्या सुंदर--निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनि राहिलें सगळे रान--स्वप्नसंगमी दंग होऊन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ती--कुमारिका ही डोलत होती;
डुलतां डुलतां गुंग होऊनी--स्वप्नें पाही मग फुलराणी
कुणी कुणाला आकाशांत--प्रणयगायनें होतें गात;
हळुंच मागुनी आले कोण--कुणी कुणा दे चुंबनदान!
प्रणय-खेळ हे पाहुनि चित्तीं--विरहार्ता फुलराणी होती;
तों व्योमींच्या प्रेमदेवता--वाऱ्यावरती फिरतां फिरतां
हळूच आल्या उतरून खाली--फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खुणवुनि नयनीं--त्या वदल्या "ही अमुची राणी"
स्वर्भूमीचा जुळवित हात--नाच नाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला--हळुहळु लागति लपावयाला
आकाशींची गंभीर शांती--मंदमंद ये अवनीवरती;
विरूं लागलें संशयजाल--संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचें वस्त्र लेवोनी--हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्नसंगमीं रंगत होती--तरीहि अजुनी फुलराणी ती!
तेजोमय नव मंडप केला--लख्ख पांढरा दहा दिशांला,
जिकडेतिकडे उधळित मोती--दिव्य वऱ्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालुनी--हांसत हांसत आले कोणी;
कुणीं बांधिला गुलाबि फेटा--झकमकणारा सुंदर मोठा!
आकाशीं चंडोल चालला--हा वाङ्मनिश्चय करावयाला;
हे थाटाचें लग्न कुणाचें--साध्या भोळ्या फुलराणीचें!
गाउं लागले मंगलपाठ--सृष्टीचे गाणारे भाट
वाजवि सनई मारूतराणा--कोकिळ घे तानांवर ताना!
नाचु लागले भारद्वाज--वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर--नवरी ही फुलराणी सुंदर!
लग्न लागतें ! सावध सारे !--सावध पक्षी! सावध वारे!
दंवमय हा अंतःपट फिटला--भेटे रविकर-फुलराणीला!
वधूवरांना दिव्य रवांनीं--कुणी गाईल मंगल गाणी;
त्यांत कुणीसें गुंफित होते--परस्परांचे प्रेम ! अहा ते!
आणिक तेथिल वनदेवीही--दिव्य आपुल्या उच्छ्वासांहीं
लिहित होत्या वातावरणीं--फुलराणीची गोड कहाणी !
गुंगत गुंगत कवि त्या ठायीं--स्फूर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला--नवगीतांनी फुलराणीला!
कवी : बालकवी
No comments:
Post a Comment