Thursday, July 7, 2011

(१७७) जाईन दूर गावा.........................घडेल काव्य माझे



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



जाईन दूर गावा घडेल काव्य माझे



तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात;
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.

कवी: आरती प्रभू


माझा मलाच वाटेल फक्त तेव्हा हेवा
घडेल काव्य माझे जेव्हा सुबोध, देवा

पाण्यांत ओंजळीच्या यावा चुकून मीन;
चुकून होईना का, मत्काव्या अर्थ यावा

शिंपीत गेयता देई जो सुबोधतेची लकेरी
अनाम त्या पक्ष्यास माझा प्रणाम असावा

देतां कुणी दुरून अदृश्यपणे इषारे
काव्यासमंत सारा सुबोध होत जावा

पेरून जाता अर्थ शारदा देवी पुरेसा
गीतांमध्ये माझ्या, मी उपकृत व्हावा

गीतांवरी असावा तिचा वरदहस्त, जेणें
गीतार्थ वाचकांना झटदिशी सापडावा

माझा मलाच वाटेल फक्त तेव्हा हेवा
घडेल काव्य माझे जेव्हा सुबोध, देवा


No comments:

Post a Comment