Monday, July 18, 2011

(२०३) आला आषाढ-श्रावण..................................मुंबापुरीतला आषाढ-श्रावण






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






आला आषाढ-श्रावण मुंबापुरीतला आषाढ-श्रावण



आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारी
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखविते नक्षी.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येता आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

कवी : बा.सी.मर्ढेकर


आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
आपली उघडुनिया छतरी
शाळे जाती पोरेपोरी.

तुडुंब जाती रस्ते भरून
“नद्यां"तून चालती वाहनं
वाहे कचरा रस्त्यांमधून
ऐसा हा नित्याचा "मन्सून”.

होई चाळीचाळीतून निर्माण
चिंता - होईल दाणादाण
पडता भिंती वा पोपडे त्यांचे.
नसे अशा घटनांना वाण.

ओल्या पानांमधले पोरे
शिकती वर्गांमधे धडे,
ओल्या वा ओलसर कपड्यांनी
करती ओलसर बाकडे.

ओशाळत नाहीत कुणीही
मुंबई-नगरपालिका-सदस्य
आषाढ अन्‌ श्रावणातले
पाहून हे वार्षिक दृश्य.

मनी तापलेल्या तारा
जनतेच्या, निवती संथ
येता आषाढ-श्रावण
म्हणती हा नित्याचा पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
आपली उघडुनिया छतरी
शाळे जाती पोरेपोरी.


No comments:

Post a Comment