Monday, July 18, 2011



(२०४) गणपत वाणी......................................................दशरथ वाणी






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






गणपत वाणी दशरथ वाणी



गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भुवई,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवई.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्ये गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पिता-पिताना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

कवी : बा.सी.मर्ढेकर


दशरथ वाणी कढी पिताना
जोडीस खाई भाकरवडी;
म्हणत असे अन्‌ मनाशीच की
कोण करिल ह्या कढी-वडीवर कडी?

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भुवई,
भुरके त्या कढीचे तो घेई
लकेर जैसी पट्टीचा गवई.

गिर्‍हाईकांची कदर राखत;
जिरे, धणे अन धान्ये गळित,
खोबरेल अन तेल तिळांचे
विकत राही न हिशेब चुकत.

स्वप्नांमध्ये मश्गुल असणे,
चकाट्या फुकाच्या पिटत बसणे,
गिर्‍हाईकांना खोळंबवणे,
असे दशरथाकडून न कधीच घडणे.

झोपण्याला बरीशी गादी
उशी अन्‌ पांघरूण जरुर ते
बाजूला पाण्याची लोटी
असे झोपणे माहित होते.

दशरथ वाण्याने त्या केली
ऐशी जीवनक्रमणा सौख्ये
दुकानातली जमीन साक्षी -
उगीच नाही केलीत दुःखे.

.
.
.
.

एके दिनी तो मरून जाता
लोके ऐकली आकाशवाणी
“सरळपणाने जगला एकूण
निपाणीतला दशरथ वाणी”.


No comments:

Post a Comment