Tuesday, July 19, 2011



(२०५) दवात आलीस भल्या पहाटी........................एका बसची गोष्ट






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






दवात आलीस भल्या पहाटी एका बसची गोष्ट



दवात आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा.

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी, सांग;
कोमल ओल्या आठवणींची
इथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवात आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.

कवी : बा.सी.मर्ढेकर


दमात आलीस भल्या दुपारी
वाघिणीच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस उडवित धुरळा
करून पादचार्‍यांची शोभा.

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हललिस; मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का छकडे-टांगे?

कुठे कंडक्टर, कुठे ड्राईव्हर?
काय तुझा कुणा इशारा?
लहरी तव इंजिनाविषयी
सांग करावी कुणी कल्पना?

अजाणत्याने ओळख कैशी
द्यावी बिघाडासंबंधी, सांग;
तुझ्यातुनी उतरूनी झाली
कृद्ध जनांची पांगापांग.

तुझ्या इंजिनामधल्या रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तुझ्या इंजिनातल्या लहरींच्या
नोंदी कशा अन्‌ कुणी कराव्या?

दमात आलीस भल्या दुपारी
वाघिणीच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस उडवित धुरळा;
धुळीस मिळाला तव तोरा!


No comments:

Post a Comment