Tuesday, July 19, 2011



(२०६) नट मित्रास पत्र..........................................ईमेल






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






नट मित्रास पत्र ईमेल



ज्येष्ठ बंधो! साष्टांग नमस्कार!
बांधवाचा घे आधि गुणाधार।
मान्य करुनी ही विनंती विशेष
वृत्त ऐके सप्रेम मम अशेष॥

पत्र पूर्वी तुज पाठविले त्याचे
त्वरे प्रत्युत्तर खास यावयाचे।
असे आधी घेतले मन्ममनाने
परी ठरले भलतेच अनुभवाने॥

पाहुनिया परि गद्य पत्र याचे
कठिण तुमचे मन, कठिण द्रवायाचे।
शब्दसुमनांचा म्हणुनि करुनि झेला
पाठवी मी; हा तरी वरिच झेला॥

जरा तुमच्या मी दृष्टिआड होता
सृष्टिआडहि झालोच काय आता?
वाढले हे जरि अंतर स्थळाचे
काय प्रेमातहि तेच व्हावयाचे?

आळसाने का हा प्रकार झाला?
पात्र किंवा मी नसे उत्तराला?
राग अथवा का अजुनि नाहि गेला?
प्रेमसिंधुच की मुळी शुष्क झाला?

निकट असता जो स्नेह दाखवीला
भासला तो ते सत्य मन्मतीला।
आजि कळला परि खरा अर्थ त्याचा
मासला की तो तुझ्या अभिनयाचा!

खरा नट तू, रे नटवरा, खराच
तारतम्याचे ज्ञान परि न साच।
अभिनयाची तुज शक्ति तर असावी
समय पाहुनि ती परी दाखवावी॥

रंगभूमी अभिनये भूषवावी
तीच वृत्ती सर्वत्र परि नसावी।
कालपत जरि दृष्टीस आड आला
तरि न विसरावे कधी मित्रतेला॥

एकटयासचि तुज दोष देत नाही
वृत्ति सर्वांची हीच दिसत पाही।
काहि काले भेटता तुम्हाहां कोठे
ओळखीसहि विसराल असे वाटे॥

ओघ कवितेचा येथवरी चाले
पत्र तुमचे इतक्यात हेच आले।
खिन्न माझे मन सुप्रसन्न होत
प्रवाहाचा बदलुनी रोख जात॥

पुढिल कार्यक्रम अजुनि ठाम नाही
परस्वाधिन ही गोष्ट असे पाही।
छत्रपतिच्या पत्रात परि तयाचा
काहि केला उल्लेख तोच वाचा॥

लेखनाचे कौशल्य फार माझे
तुझा उपहासच त्यास योग्य साजे।
लिहित बसणे तुम्हास नित्य पत्रे
लेखनाचे कौशल्य हेच सारे॥

असे वरचेवर पत्र पाठवावे
आणि प्रकृतीते नित्य जपत जावे।
उण्या-अधिकाचा राग नच धरावा
भूतकालासह तोहि भूत व्हावा॥

बहुत लिहिणे वद काय याहुनीहि
विनंति नित्याची लोभ असावा ही।
काव्यदेवीते द्यावया विराम
घेइ आज्ञा,
आपला मित्र, ’राम’॥

कवी : गोविंदाग्रज

ज्येष्ठ बंधो! साष्टांग नमस्कार!
बांधवाचा ऐक आधि गुणाकार।
बे असे एक बे, बे दुणे चार
ऐके सप्रेम अता समाचार॥

पूर्वी ईमेल तुज पाठविले त्याचे
त्वरे प्रत्युत्तर खास यावयाचे।
असे आधी घेतले मन्ममनाने
परी ठरले भलतेच अनुभवाने॥

पाहुनिया परि गद्य ईमेल माझे
कठिण तुमचे मन, कठिण द्रवायाचे।
पद्यसुमनांचा म्हणुनि करुनि झेला
पाठवी मी; हा तरी वरिच झेला॥

जरा तुमच्या मी दृष्टिआड होता
सृष्टिआडहि झालोच काय आता?
वाढले हे जरि अंतर स्थळाचे
नव-"टेक्‌"युगी असे केवि ते शून्याचे॥

आळसाने का हा प्रकार झाला?
तव प्रकृतीत बिघाड की झाला?
बिघाड तव कंप्युटरी की झाला?
की आय्‌एस्‌पी सेवेत वा खंड पडला?

.
.
.
.

.
.
.
.

.
.
.
.

एकटयासचि तुज दोष देत नाही
बेफिकिरी नसून अन्य कारण शक्य राही।
शक्य कारणत्रयी वर निर्दिष्ट केली
असे ती त्रयी मन्मनी मी राखली॥

ओघ कवितेचा येथवरी चाले
तव ईमेल इतक्यात हेच आले।
गृहीत कारणत्रये न मी खिन्न होतो
ईमेल पाहुनी परी मी मुदित होतो॥

.
.
.
.

काव्यरचनेचे कौशल्य फार माझे
तुझा गौरवची त्यास योग्य साजे।
“ट”सी जोडणे “ट” तू जाण बा, रे
काव्यरचनेचे कौशल्य असे सारे॥

असे वरचेवर ईमेल पाठवावे
आणि प्रकृतीते नित्य जपत जावे।
मत्काव्यलेखनगौरवास न चुकावे
न प्रार्थावे - मत्काव्यलेखनभूत उतरावे॥

बहुत लिहिणे वद काय याहुनीहि
विनंति नित्याची लोभ असावा ही।
काव्यदेवीते द्यावया विराम
होतो उद्युक्त ह्या क्षणी गाळुनी घाम!


No comments:

Post a Comment