Sunday, July 17, 2011

(१९९) अस्थाई............................................महागाई



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अस्थाई महागाई



अस्थाईवर स्थायिक झालो,
चुकून गेला पहा अंतरा;
ओरडून का अता लागणे
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेत झुकला निशापती अन्
अस्मानाच्या कलल्या तारा;
अंधारावर विझून गेला
रात्रीचा या वीज-पिसारा.

क्लिन्न मनोगत मोटारींचे
कुशीत शिरले काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

शांत जगाच्या घामावरला
उडून काळा गेला वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
जराच हलला श्वासोच्छ्वास.

अस्थाईवर पुन्हा परतलो,
चुकून गेला पहा अंतरा;
ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणे
अता खालचा परंतु हसरा.

कवी : बा.सी.मर्ढेकर


स्वस्ताईचा आशिक होतो,
चकवून गेली दूर अंतरा;
ओरडून का अता लागणे
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेत झुकती कोटीपती अन्
अस्मानची त्यांची मर्यादा;
बघता बघता संपून जाई
इतरांचा मोजका खुर्दा.

तीन मनोगत मोटारींचे
मनात रमते कोटीपतींच्या;
तालबंद अन् जोड्याची ये
टाप समेवर इतरांच्या.

श्रांत जनांच्या घामावरला
उडून जाई कधी न वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
येती जाती विफल निश्वास.

स्वस्ताईकडे कुठून परतणे,
चकवून गेली पार अंतरा;
श्रेयस्कर, गळ्यात धोंड बांधणे
अन्‌ राखणे चेहरा हसरा.


No comments:

Post a Comment