Thursday, July 14, 2011

(१९३) सोपेच असतात तुझे केस.......................सोप्यावरती असता पहुडलो



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



सोपेच असतात तुझे केस सोप्यावरती असता पहुडलो



सोपेच असतात तुझे केस
सोपीच असते लकेर डोळ्यांची
सोप्याच असतात तुझ्या गाठी
कठीण असते तर्‍हा चोळ्यांची

सोपेच असते मानेचे वळण
सोपीच उतरण निमुळत्या पाठीची
सोपेच असते तुझे पाऊल
कठिण असते वाट दाटीची

सोपाच असतो राग, अनुराग
सोपीच असते तुझी कळ
सोप्या सोपस मांड्यांमध्ये
दहा हत्तींचे असते बळ...

कवी : विंदा करंदीकर


सोप्यावरती असता पहुडलो
होतो पाहत वर आढ्याकडे
अन्‌ विचार संचरले मन्मनी
चोळीकडून मांडीकडे

झटपट उठलो सोप्यावरुनी
करून विचार एक असा की
करून टाकू सोपस्काराविन
एक सोप्पी कविता तिरकी

गुंफवू या या सोप्प्या कवितेत
सोपे केस, सोपी लकेर
वगैरे वगैरे, अ‍न्‌ त्यांच्या जोडीला
घालून चोळ्या अन्‌ मांड्यांची भर


No comments:

Post a Comment