Sunday, July 31, 2011



(२१८) अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही................एका कवीचे स्वगत






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






अद्यापही सुर्‍याला एका कवीचे स्वगत



अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी..
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
(गावात सज्जनांच्या आता तणाव नाही)

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाय नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्ध्वस्त पापियांनी?
(संतांतही घराच्या राखेस भाव नाही)

उच्चारणार नाही कोणीच शापवाणी…
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे…
हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही!

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

कवी : सुरेश भट


अनुप्रासांचा मला अद्याप सराव नाही
ताल-यमकांची मला अद्याप जाण नाही

येथे पिसत शब्द प्रयासे, बैसलो मी
कधीकाळी जमेल कविता मला ठाव नाही

काव्यरचना अर्थपूर्ण असे दुर्घट महान
आकांक्षी कवींपैकी बहुतांचा निभाव नाही

शब्दां गमे विचारू कोठे पहाट गेली
त्यांचा दिसे परंतू पत्ता कुठेच नाही

काल पेटलेली प्रतिभा, विरून क्षणात गेली
प्रतिभाराधनात अख्खी रात्र निघून गेली

झाले कुठे फरारी शब्द भूमिगत ते
आणून पकडून त्यांना रचायचीत गीते

देऊ म्हणतो आज्ञा गारद्यां की “हुडकावे -
अन्‌ (मारता न त्यांना) अटक शब्दां करावे"

जावे कुण्या ठिकाणी उद्विग्न कविजनांनी
शोधण्या राख आणि मग ती माथी घालण्यासी?

उच्चारली ह्या कवीला का कोणी शापवाणी?
ऋषीमुनींचा नेम काही सांगता येत नाही

भास - साध्याच शब्दांचा एल्गार येत आहे
नि तो अर्थदुर्गम शब्दांचा जमाव नाही

ओठी न तुमच्या येवो अद्याप नाव माझे,
पण भांडण्याचा कुणाशी माझा स्वभाव नाही

1 comment: