Sunday, July 10, 2011

(१८५) तळ्याकाठी.............................अनाद्यनंत दिक्काल



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तळ्याकाठी अनाद्यनंत दिक्काल



अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा
शोधीत थकून आली असते.

जळाआतला हिरवा गाळ
निळ्याशी मिळून असतो काही;
गळून पडत असताना पान
मुळी सळसळ करीत नाही.

सावल्यांना भरवीत कापरे
जलवलये उठवून देत,
उगीच उसळी मारून मासळी
मधूनच वर नसते येत.

पंख वाळवीत बदकांचा थवा
वाळूत विसावा घेत असतो,
दूर कोपर्‍यात एक बगळा
ध्यानभंग होऊ देत नसतो.

हृदयावरची विचाराची धूळ
हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे मला वाटते.

कवी : अनिल


अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता मनोरम
सायंसमयी प्रसृत असते.

जळाआतला हिरवा गाळ
निळ्याशी मिळून असतो काही;
गळून पडत असताना पान
मुळी सळसळ करीत नाही.

सावल्यांना भरवीत कापरे
जलवलये उठवून देत,
उगीच उसळी मारून मासळी
मधूनच वर नसते येत.

पंख वाळवीत बदकांचा थवा
वाळूत विसावा घेत असतो,
दूर कोपर्‍यात एक बगळा
ध्यानभंग होऊ देत नसतो.

विचार अनाद्यनंत दिक्कालाचे
शांत, मना जिथे संपृक्त करते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे मला वाटते.


No comments:

Post a Comment